Ticker

6/recent/ticker-posts

कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ साजरा झाला शिवजयंतीचा सोहळा, हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवांनाकडून अभिवादन

कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ झाला शिवजयंतीचा सोहळा, हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवांनाकडून अभिवादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन



मुंबई, दि. १९ : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. कुपवाडा येथे उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम झाला. सभोवताली सर्वत्र बर्फ अशा कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेले अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, त्यांचे मनोबल उंचावत राहील, असे मुख्यमंत्री पुतळा अनावरण समारंभात म्हणाले होते. त्याची प्रचिती आज दिसून आली.

आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला  जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया केला होता.

कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ साजरा झाला शिवजयंती उत्सव video पहा. 



See video on Instagram

https://www.instagram.com/p/C3iOXT4oojJ/?igsh=ejNxMWZtMWY1MHFo

Post a Comment

0 Comments