Ticker

6/recent/ticker-posts

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराचे होणार सुशोभीकरण

मौजे उमरठ (जि. रायगड) येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या सुशोभीकरण कामाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला.



छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि स्वामी निष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा कधीही विसरू शकणार नाही. तानाजी मालुसरे यांचे अतिशय भव्य दिव्य असे स्मारक करण्यात येईल. या स्मारकासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. 

गड - किल्ले, स्मारक यासाठी पैसे कुठे कमी पडणार नाही कारण आपल्या सरकारने आता गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखील मोठी तरतूद केलेली आहे.  पहिल्या टप्प्यात राज्यातील ३२ शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आपण ५० कोटी शिवसृष्टीला देखील मंजूर केलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी कुठेही काही कमी पडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

आपण आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.  तिथं ज्या दिवाण-ए-आम या महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला आपला मराठी बाणा आणि स्वाभिमान दाखवून दिला, तिथंच दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतोय.  त्याचबरोबर आज भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भेदक नजर आणि त्यांची तलवार पाकिस्तानच्या दिशेने रोखलेली आहे, त्यामुळे पाकिस्तान देखील आपल्या हिंदुस्तानकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत करणार नाही असे काम आपल्या सैनिकांनी केलेलं आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. 

उमरठ येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

असे असेल स्मारक…

मौजे उमरठ (जि. रायगड) येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराचे सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.  यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभीकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते, काँक्रिट गटार,  कंपाउंड वॉलचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. यासाठी सुमारे चार कोटी पंधरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments